"कृपया, गाडीचे पायदान आणि प्लॅटफॉर्म वरील अंतरावर लक्ष द्या!" हे ऐकण्यासाठी मुंबईकरांचे कान आतुरतेने वाट पाहात आहेत. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आली. मुंबईत राहणाऱ्या अगणित लोकांचा प्रवास या लोकलपासून सुरु होतो; पण या लोकलचा प्रवास कधी सुरू झाला, हे आपल्याला माहीत आहे का? नसेल तर चला मग, वंटास मुंबई ही माहिती आपल्याला सविस्तररित्या देत आहे.

कधी सुरू झाली मुंबईत पहिली लोकल
167 वर्षांची झालेली आपली लोकल पहिल्यांदा 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी मुंबईपासून ते ठाण्यापर्यंत धावली होती. तेव्हा या लोकलला 14 डब्बे होते. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट 21 तोफाची सलामी देत ही पहिली लोकल सुरू करण्यात आली होती. पहिल्या प्रवासात या लोकलने केवळ 35 किमीचा प्रवास केला होता. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या लोकलला खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला मुंबईतुन पहिली औपचारिक सुरुवात झाली. यावेळी या ऐतिहासिक रेल्वे प्रवासाचे 400 प्रवासी साक्षीदार होते. प्रथमच सुरू झालेल्या या लोकलमध्ये त्या वेळी शौचालयाची सुविधा नव्हती.

आजची मुंबईची लाईफलाईन
2020 मध्ये पहायला गेलं तर लोकल सेवेमध्ये अनेक बदल झाले आहेत. 14 डब्यांची लोकल ही 12 डब्यांची आणि 15 डब्यांची झाली आहे. लोकलच्या बरोबरीने स्थानकांतदेखील अनेक सुधारणा झाल्या आहेत, तसेच लोकलचे क्षेत्रही वाढले आहे. एका दिवसात लोकलने सुमारे 7 कोटी 5 लाख लोक प्रवास करतात. आज अनेकांची उपजीविका म्हणजे मुंबईची लोकल आहे. जेव्हा मुंबईत भांडवलशाही जन्माला आली तेव्हा प्रवासाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली लोकल सेवा कालांतराने काही लोकांची व्यवसायाची गाडी बनली.
 
आज कोरोना महामारीमुळे कामाचे हाथ घरी बसले आहेत. सर्व व्यवसाय ठप्प झाले आणि त्यामुळे आपली मुंबईची लोकल देखील बंद करण्यात आली. आज कित्येक दिवस उलटून गेले आहेत तरी लोकल बंद आहे. पाहायला गेलं तर लोकलमध्ये अनेक छोटे मोठे व्यवसाय चालतात. ज्वेलरी सामान, अनेक घरवापरातील छोट्या वस्तू, भाजी, मासे, फुले-फळे, अभ्यासाची सामग्री, खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टी आज सहजरित्या लोकलमध्ये विकल्या जातात. हा व्यवसाय करणारे अनेक लोक त्यावर पोटाची भूक भागवत असतात. गरिबांपासून श्रीमंत माणूस हा लोकलमध्ये प्रवास करतो, त्यामुळे लोकलमध्ये छोटमोठे व्यवसाय करणारे गरजू आपली आर्थिक भूक भागवत असतात; पण आज हीच लोकल बंद असल्यामुळे हे लोक आर्थिक संकटात सापडले आहे. 

तर मित्रांनो, ही होती मुंबईच्या लाईफलाईनची कहाणी. आपल्याला आणखी अशा काही गोष्टींची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच आम्हाला कंमेंट सेक्शनद्वारे कळवा, आम्ही ती आपल्यापर्यंत नक्की पोहचवू.


हेही वाचाच...