मी गेल्या काही वर्षांपासून मुंबईत आलो. सुरूवातीला मुंबईबद्दल मला तितकी माहिती नव्हती, मात्र गावातून बाहेर पडायचं होतं आणि स्वत:ची कमाई सुरू करायची होती, म्हणून मी मुंबईत आलो.
मुंबईत तशी माझी दोघां-तिघांबरोबर सोडली तर कोणाशीच ओळख नव्हती. आता नवे मित्र आणि मैत्रिणी आहेत, ते मला खूप छान ओळखतात, आमच्यात घट्ट मैत्री आहे, जी एकमेकांची साथ निभावते, असं काही वर्षांपुर्वी मुंबईत आलेला वेदांत, वंटास मुंबईशी बोलताना सांगतो.
वेदांत म्हणतो की सुरूवातीला मला खूप अडचणींना सामोरे जावं लागलं, नोकरी मिळवतानाच मोठी संकटं समोर येत होती, ज्यात शिक्षण झालय, त्याप्रकारची नोकरी मिळणेही मुश्किल झालं होतं. मात्र प्रयत्न सुरू होते आणि मी धडपड करत राहिलो, या सगळ्यात मुंबईच्या माणसांनी मला कधी उपाशी ठेवलं नाही, सुरूवातीला भूक लागली की जेवण मिळायचं. नाहीतर रस्त्यावरच्या वडापाव किंवा समोसा पावाने माझं एकावेळेचं पोट हमखास भरायचं. टिकून राहिल्याचं फळ मुंबई आज मला देत आहे. आज मी चांगल्या नोकरीवर आहे. चांगला पगार आहे. त्यातल्या त्यात वर्क फ्रॉम होम सुरू आहे. मला घरी जाण्याची ही योग्य वेळ वाटत नाही. असं वेदांत म्हणतो.
तसं पाहिलं तर मुंबईने माझ्या वाईट काळात खूप साथ दिली, तशी ती इथे येणाऱ्या सगळ्यांनाच साथ देते. इथे येणाऱ्या प्रत्येकालाच एकमेकांची गरज पडते आणि प्रत्येकजण एकमेकांना मदत करत असतात. माझंही तसच झालय, आज मला मुंबई सोडून जावसं वाटत नाही. मी माझी सुरक्षा घेऊन व्यवस्थित आहे, त्यामुळे मी आतापर्यंत सुरक्षित आहे, त्यातल्या त्यात गावाकडे जाण्यासारखंही हे वातावरण नाही, कारण तिकडचे सगळे घाबरले आहेत. मुंबई सारख्या शहरांमध्ये थांबलेला कोरोना व्हायरस गावाकडे पसरू लागलाय, त्यामुळे ही जोखीम सध्यातरी मी उचलणार नाही. अशी माहिती वेदांतने वंटास मुंबईशी बोलताना दिली होती.
आज मुंबईत गावाकडचे अनेक लोक अडकून आहेत, त्यातल्या अनेकांना गावी जावसं वाटतय तर अनेकांना मुंबई पुन्हा सुरू झाल्याने इथेच राहावसं वाटतय. नेमकी आज गरज कशाची, हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज मुंबईतले अनेक परप्रांतिय मजूर आपल्या गावी गेले आहेत, त्यांच्याकडे गावी जाण्यापेक्षा कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे अनेक कामाची ठिकाणं ओस पडली आहेत, तिथे अनेक कामगार वर्ग हवा आहे, त्यामुळे ही अनेकांना रोजगार मिळवण्याची संधी आहे. लॉकडाऊन लागण्याआधी 'मी वडापावची टपरीही चालवेन' असं ज्यांचं म्हणनं होतं, आज त्यांच्यासाठी मोठं हॉटेल चालवण्याची संधी आली आहे. घाबरून तीन महिने आपण घरात शांत बसलो, मात्र आपलं पोट शांतं बसलं नाही, कोरोनासोबत जगण्याची ही वेळ आहे. त्यामुळे मागे फिरून चालणार नाही.
आपली सुरक्षितता बाळगत जे मिळेल ते काम करणे, हे आपलं पहिलं कर्तव्य असेल, कारण अनेकांना ज्या मुंबईने बाळगलं आहे, आज त्याच घाबरलेल्या मुंबईला उभे करण्याची जबाबदारी आपली आहे. हा लेख नक्कीच तुम्हाला आवडला असेल, तर आम्हाला कमेंटमधून कळवा. अशा अनेक विषयांची जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर त्याबद्दल आम्हाला सुचवा, आम्ही ती माहितीही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
हेही वाचाच...


0 Comments