महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस अगदी वाऱ्याच्या वेगाने वाढत आहेत, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहेत, यामध्येच महाराष्ट्रात एक चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल. 

कोरोना असताना महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि राज्यपाल असे त्रिसूत्री राजकारण होत आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीला महाराष्ट्रातील बडे नेते गेल्यावर बातम्यांसाठी नवनवीन विषय मिळत आहेत, हे खरच आहे.

जेव्हा राज्यपालांची निवड झाली तेव्हापासूनच महाराष्ट्राचे राज्यपाल हे चर्चेचा मुद्दा आहेत. जेव्हा राज्यपाल पदी नियुक्ती झाली, तेव्हा मराठीतून शपथ घेणारे राज्यपाल म्हणून वेगळेपण सिद्ध केल्यानंतर त्यांनी मराठीतून अभिभाषण करणारे राज्यपाल अशीही ओळख त्यांनी अगदी सुरुवातीपासून मिळवली. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन या महाराष्ट्राच्या आगामी राज्यपाल असतील, अशी चर्चा होती. मात्र, कोश्यारी यांचं नाव जाहीर झाल्यानं या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला. सी. विद्यासागर राव यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारींची नियुक्ती केली.

त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर थोड्याच दिवसात राज्यात निवडणुका झाल्या. निवडणुकीचे निकाल लागले आणि राज्यपालांमुळे सर्वत्र वृत्तपत्रांचे मथळे अगदी भरून निघू लागले. त्यानंतर सत्तास्थापनेचं मोठं नाट्यही घडलं. कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना अचानक पहाटेची शपथ दिल्यानंतर त्यांच्यावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप झाला. महाराष्ट्रातील जनता अगदी त्यांना खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करू लागले. महाराष्ट्रात ठाकरे सरकार स्थापन झाले. ठाकरे सरकारचा ग्रँड शपथविधीविषयी देखील राज्यपाल नाराज होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आमदार म्हणून नेमणूक करायला कोश्यारींनी विरोध केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अखेर पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानंतर राज्यपाल कोश्यारींनी उद्धव ठाकरेंचा आमदार व्हायचा मार्ग मोकळा केला. कोरोनाच्या काळात काही महाविद्यालयीन परीक्षा होणार नाहीत, असे राज्यसरकारने सांगितले, या मुद्द्यावरूनदेखील महोदयांनी सरकारला विरोध केला.

कोण आहेत भगत सिंह कोश्यारी?
उत्तराखंडच्या बगेश्वर जिल्ह्यात भगत सिंह कोश्यारी यांचा 17 जून 1942 रोजी जन्म झाला. उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य होण्याआधी उत्तर प्रदेशचा भाग होता. त्यामुळं कोश्यारींचं बालपण, शिक्षण आणि सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभही उत्तर प्रदेशातच झाला. अलमोडा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात एमएचं शिक्षण घेतलं. एमएची पदवी मिळवलेल्या कोश्यारींनी शिक्षक म्हणूनही काम केलं. ते उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील राजा इंटर कॉलेजमध्ये काही वर्षे व्याख्याते होते. उत्तराखंडमधील शिक्षण क्षेत्रात कोश्यारींनी मोलाचे योगदान दिले आहे. पिठोरागड येथील 'सरस्वती शिशू मंदिर', 'विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज' आणि 'नैनिताल येथील सरस्वती विहार उच्च माध्यमिक शाळा' या संस्थांचीही स्थापना भगत सिंह कोश्यारींनी केली.

महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती. 1961-62 या काळात ते अलमोडा कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेत कार्यरत होते. पेशानं शिक्षक आणि पत्रकार असलेल्या कोश्यारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सामाजिक कामास सुरुवात केली. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री केली.

उत्तराखंडचे दुसरे मुख्यमंत्री :
कोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरूवात संघातूनच झाली. उत्तर प्रदेशपासून 2000 साली वेगळं झालेल्या उत्तराखंड राज्यात भाजपची धुरा कोश्यारींच्या हाती देण्यात आली. ते उत्तराखंडचे पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर उत्तराखंड राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होण्याच मानही त्यांना मिळाला. अविवाहित असलेल्या भगत सिंह कोश्यारींनी अवघं आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कामासाठी व्यापलं आहे. 

कोश्यारींनी पत्रकारितेतही योगदान दिले आहे. 1975 पासून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पियुष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत. समाजकारण, राजकारण यांसह साहित्य हाही कोश्यारींच्या आवडीचा विषय. 'उत्तरांचल प्रदेश क्यों?' आणि 'उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान' ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

काँग्रेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविरोधात कोश्यारी यांनी आवाज उठवला होता. परिणामी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. 3 जुलै 1975 ते 23 मार्च 1977 असे सलग तीन वर्षे ते तुरुंगात होते.

भगत सिंह कोश्यारी यांनी आतापर्यंत भूषवलेली महत्त्वाची राजकीय पदं :
  • मे 1997 साली ते उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेत सदस्य म्हणून निवडून गेले.
  • उत्तर प्रदेश सरकारमधील महत्त्वाच्या समित्यांच्या माध्यमातून कोश्यारींनी महत्वाची भूमिका बजावली. 1999-2000 या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीतही होते.
  • उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतरच्या पहिल्या सरकारमध्ये कोश्यारी हे ऊर्जा आणि जलसिंचन मंत्री होते.
  • 29 ऑक्टोबर 2001 ते 1 मार्च 2002 या कालावधीत कोश्यारींनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली.
  • मार्च 2002 ते नोव्हेंबर 2008 ही जवळपास सहा वर्षे ते उत्तराखंडच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
  • नोव्हेंबर 2008 साली कोश्यारी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य झाले. राज्यसभेत असताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध समित्यांमध्ये काम केलं. फेब्रुवारी 2009 ते मे 2009 या कालावधीत कोश्यारी हे केंद्राच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. तर ऑगस्ट 2009 पासून ते ऊर्जा समितीचेही सदस्य होते.


हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि आमच्याशी आमच्या सगळ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून कनेक्ट राहा.

हेही वाचाच...