मे सही हु या गलत, इसका फैसला आप नहीं, देश की जनता करेगी | क्योकीं सबसे उपर एक ही अदालत को मानता हु, वो है जनता की अदालत !
नक्कीच हा संवाद परिचयाचा वाटत असेल. मराठी माणसांच्या हक्काचा आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारा पक्ष तो म्हणजे शिवसेना. याच शिवसेनेची 19 जून, 1966 रोजी महाराष्ट्रातील मुंबईमध्ये स्थापना करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा हा गाजलेला संवाद आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला आज 54 वर्षे उलटून गेली, तरीही महाराष्ट्रात शिवसेनेचा दबदबा कायम आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अवघ्या 18 जणांच्या साक्षीने बाळासाहेबांनी मराठी माणसांचे हित जोपासण्याची शपथ घेत "शिवसेना" पक्षाची स्थापना केली. खरे पहायला गेले तर, मार्मिक या साप्ताहिकेतून शिवसेनेचा जन्म आधीच झाला होता. 1960 साली, बाळ ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत असताना आपली नोकरी सोडली आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हातून उद्घाटन करून मार्मिकला सुरुवात केली. त्या काळी मार्मिक हे शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून काम करत होते. मार्मिक या साप्ताहिकेमधून नेहमीच मराठी लोकांच्या हक्काची बोली बोलली जात असे.
शिवसेना पक्षाचा मुख्य अवयव तसेच अग्रदूत म्हणून मार्मिककडे पाहिले जात असे. मार्मिकमध्ये बेरोजगारी, स्थलांतरित लोकांची गर्दी, मराठी कामगारांची भरती आणि रानडे रोड येथील कार्यालय यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले होते. अनेक मराठी माणसे ‘मार्मिक’च्या कार्यालयात येऊन आपल्या व्यथा आणि वेदना मांडायचे. व्यथित लोकांची संख्या वाढत असल्याने फक्त मार्मिक मधून प्रश्न सुटणार नव्हते. त्यासाठी काहीतरी वेगळे करणे आवश्यक होते. मार्मिकला सुसंघटित करणे गरजेचे वाटले आणि या दृष्टीने शिवसेनेची स्थापना करण्यात आली.
मुंबईत त्या काळी, अनेक स्थलांतरीत तसेच गुजराती लोक व्यवसाय तसेच जागांवर कब्जा करून बसले होते. मराठी माणूस हा साधी एक नोकरी मिळवू शकत नव्हता. मराठी माणसाला कमी दर्जा देऊन अर्धी मुंबई ही गुजराती तसेच स्थलांतरीत लोकांनी व्यापली होती, त्यामुळे मराठी माणसाला जगणे यावेळी कठीण होऊन बसले होते. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर मुंबईचा कायापालट झाला आणि मराठी माणसांची मुंबई बनली. मुंबईत मराठी माणूस आपला धंदा हा खरा शिवसेनेमुळे करू शकला. पुढे जाऊन मुंबईत मराठी माणसाने वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर सत्तेत असणे आवश्यक असल्याची जाणीव बाळासाहेबांना झाल्यावर 1968 साली शिवसेनेने महापालिका निवडणुक लढवली आणि मुंबई महापालिकेत प्रवेश मिळवला.
मुंबई बरोबर महाराष्ट्रातील जनतेनेही शिवसेनेला चांगला प्रतिसाद दिला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा. शिवसेनेचा पहिला मेळावा हा 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. ‘मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्हती. तरीही मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.
17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यांनंतर त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी आली आणि सामना या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.


0 Comments