गेल्या काही दिवसांपासून मुंबई शांत आहे. ती तरी काय करणार बिचारी, राहावं लागतय तिला. स्वत:चा जीव मुठीत घेऊन आजूनपर्यंत जगत होती, आता श्वास मोकळा झालाय त्या मुंबईचा, तर बिचारी कंटाळली आहे. प्रत्येक दिवस तिच्या जीवावर नाचणारा प्रत्येकजण आज तिला एकटं सोडून कुठे गायब झालाय हे त्या गायब होणाऱ्यालाच माहित. पण तुडूंब भरलेली मुंबई; जिथे उभे राहाण्यासाठी जागा नव्हती, आज तिथे स्मशान शांतता आहे.
मुंबईने आजूनपर्यंत काहीही झालं तरी कोणाला दूर केलं नाही. रोज नव्या लोकांना ती मिठीत घेत असते. गरज पडली तर आपली मिठीदेखील ती मोठी करते, आज अशाच एका 'ती'ची गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
आज पोलीस महोदयांच्या कृपेने मरिनला जाण्याची संधी मिळाली. तिथे गेल्यावर एक भकास चित्र समोर आलं. मुंबईची अनेक प्रेम प्रकरणं दिवसरात्र ज्या कट्ट्यावर रंगायची, अनेक लोक आपला थकवा घालवण्यासाठी जिथे बसायची, अनेकांची सकाळ, संध्याकाळ तिथल्या सुर्योदय आणि सुर्यास्ताने व्हायची, अनेकांच्या हजारोंचे धंदे ज्या मरीनवर डन होतात, आज तीच मरिन एकटी होती.
अचानक झालेल्या या मानवविरहित बदलामुळे समुद्रसुध्दा घाबरून गेला असेल, कित्येकदिवस पाण्याची बाटली, प्लास्टिकच्या पिशव्या आणि अनेक पोरासोरांची लफडी बघत रमणारा समुद्रसुध्दा आपल्यातच खेळताना दिसत आहे.
अनेक लोक तिथून येजा करत आहेत, मात्र तिच्याजवळ बसणारं, आपुलकीने दोन शब्द बोलणारं, तिला काही वाचून दाखवणारं, तिच्यासोबत मन मोकळं करणारं, तिच्या अंगाखांद्यावर खेळणारं आज कोणीच नाही. तिला माहित होतं, की रोज नव-नवीन माणसं तिला भेटायला येत असली तरी, तो शेंगदाणे विकणारा पोऱ्या तरी तिच्यासोबत रोज असायचा. स्वत: तिच्या आंगाखांद्यावर पडलेली घाण साफ करायचा, मात्र तोही आजकाल कुठे दिसेनासा झालाय. ते कबुतरपण खूप हुशार झालेत वाटतं; कारण तिही माणसं नसल्याने कुठे गायब झाल्याचे चित्र आहे.
असो, मुंबईकरांसाठी त्याच मरिनने एक पत्र लिहलय तुम्हाला, जाताजाता तेवढं सांगुन टाकतो...
प्रिय मुंबईकर,
विषय - माझी आठवण न येणे बाबत,
हजारो वर्ष तुम्ही किंवा तुमच्यापैकी कोण ना कोणतरी माझ्यासोबत राहिलं आहे. तुम्ही रोज कुठे ना कुठे तरी जात असता; पण मी रोज इथेच आहे, कारण तुमच्यातला एक गेला की दुसरा मला भेटण्यासाठी येत असतो, म्हणून थांबावं लागतं. त्यामुळेच काहीशी अजुन मी इथेच आहे.तुम्ही आता तुमच्या जिवाच्या भितीने आला नाहीत म्हणून मी काय रागवणार नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या, तुम्ही बरे झालात, तुमच्या आजूबाजूचं वातावरण ठीक झालं, की नक्की या! पण आता तुम्ही घरीच राहा, तो कोण कोरोना आलाय म्हणे तुमच्याकडे, खूप माणसांना मारत आहे म्हणे, असच काही वर्षांपुर्वी एक प्लेगबाई आली होती. त्या चांडाळणीने पण असच लोकांना मारलं होतं, पण नंतर झालं सगळं ठीक, आताही होईल सगळं ठीक, या मुंबईत वाईट करणारं कोण तसं जास्त काळ टिकत नाही, हे माहित आहे ना... पण जरा उशीर लागेल... एवढंच!


1 Comments
Just couple of week before CORONA LOCK-DOWN.. I went to Marine-drive that too after 20 years...everything was changed!...After office hours we used to stole watching the changing colours of sky....few people most of them with creative mindset... romantic creatures from ad-agencies like me, join by Debonair Magazine photographer and TV/drama artists....but all we were inclinated towards "Clean Bombay" philosophy and entire marine-drive used to be clean neat....But what i saw made me suffocated dirt-dirt-dirt made by manner-less crowd...AND TEAR FLOW FROM MY EYES THINKING OF THE WHAT SITUATION SEA HAS TO FACE... And now after reading your article I feel, CORONA has brought the Natural Pause to take care of our believed Mumbai, to enjoy "PEACE OF MIND".
ReplyDelete