कोरोना मुंबईत येऊन एक महिण्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस अधिक होताना दिसत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ही पंधरा हजारांच्या पलीकडे पोहोचली आहे. यामुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. देशातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्रातील निम्याहून म्हणजे 65 टक्क्यांहून अधिक रुग्ण केवळ मुंबईत आहेत. दोन दिवस अगोदर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे, त्यामुळे मुंबईकरही येणाऱ्या परिस्थितीला पाहुन संभ्रमित झाले आहेत. कोरोनाचा प्रसार कमी व्हावा म्हणून आपण मेपर्यंत लॉकडाऊन पाळणार आहोत, यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होऊन रूग्णांची संख्या घटेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. जगात थैमान घालणारा कोरोना एक वेगळा इतिहास उमटवत आहे.

असं म्हणतात की, इथे येणारा प्रत्येकजण कायम टिकून राहाण्यासाठी येत नाही, त्यामुळे कोरोनाही लवकरात लवकर जाईल, हे नक्की! परंतु जाताना रिकामा जाणार नाही, हे वास्तव आहे. चीन व इटलीने कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवले आहे (जरी तिथली संख्या वाढत असली तरी). त्यामुळे तेथील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास थोडा अवधी लागणार आहे, त्याच प्रकारे मुंबईतील कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर मुंबई पूर्व पदावर येऊन आपली पहिली धावती मुंबई पाहायला मिळेल. 

यामध्ये एक शंकेची बाब असेल ती म्हणजे आपण एवढे मोठे आरोग्य संकटाला सामोरे गेलो आहोत, म्हणजे याचे अनेक तोटे आपल्याला सहन करावे लागणार आहेतच. ते तोटे अनेक प्रकारचे असतील. ज्याप्रमाणे कोरोनाच्या अगोदर जशी मुंबई होती, ती आपली वंटास मुंबई पाहणं हे जरा मुश्किलच असणार आहे, त्याला कारण जे मुंबईने दुःख आयुष्यात पाहिले नाही ते कोरोनामुळे पाहाण्याची वेळ आलीये.

काय असतील मुंबईतील बदल?
मुंबईत जे घडलं नाही ते कोरोनाने आपल्याला दाखवलं. मुंबईतील काही बदल हे तात्पुरते असतील; पण काही बदल हे आपल्याला अतोनात यातना देणारे असतील आणि मुंबईकरांच्या जगण्यावर दूरगामी परिणाम करतील.
  • मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या आर्थिक व्यवहारांना मुंबईतूनच चालना मिळत असते. देशाची अर्थव्यवस्था ही डगमगत आहे. आता राज्य सरकार आणि पालिकेसमोर दोन मुख्य प्रश्न आहेत, ते म्हणजे काय वाचवायचं? मुंबईकरांचे जीव की अर्थव्यवस्था? 

  • अर्थतज्ञांच्या मते, कोरोनाची तुलना युध्दाशी होत असली तरी युद्धकाळात अर्थव्यवस्थेची जी स्ट्रॅटर्जी असते, ती या संकटात वापरता येणार नाही. युद्धकाळात उत्पादन वाढते, याला वॉर टाइम इकॉनॉमी म्हणतात. सध्या आपल्याला अँटी वॉर टाइम इकॉनॉमीची गरज आहे. म्हणजे उत्पादन शक्य तितके कमी करायचं. म्हणजेच आपल्याला अशी व्यवस्था तयार करावी लागेल की लोकांच्या उपजीविकेवर परिणाम न करता उत्पादन कमी करू शकेल. सोप्या शब्दात म्हणजे मुंबईकरांना अनावश्यक वस्तू आणि सेवा यांचा मोह सोडावा लागेल.

  • मुंबईतील राजकीय, प्रशासकीय, आणि वैदकीय सेवा किती सक्षम आणि स्वयंपूर्ण आहेत, याची परीक्षा म्हणजेच मुंबईकरांचा कोरोना विरोधातील सुरू असलेला लढा होय. कोरोना गेल्यावर त्यावर राजकारणाचे फड तर उभे राहणारच आहेत यात तिळमात्र शंका नाही, कारण एवढं मोठं संकट असूनही राजकारण आता सुरूय, तेव्हा तर राजकारण्यांना संपूर्ण मैदान मोकळं मिळणार आहे. 

  • या आरोग्य संकटातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबईला धाबे, सेल्फी पॉईंट, मोनो रेल्वे, मेट्रो आणि बुलेट ट्रेनची गरज नसून सक्षम आणि उत्कृष्ट दर्जाचे हॉस्पिटल असावेत ही गोष्ट महत्वाची आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीत आरोग्य हा विषय प्रामुख्याने केजरीवाल यांनी धरून ठेवला. याचा फायदा राजकारणातही झाला आणि कोरोनमध्येही. त्यामुळे जे दिल्लीत घडलं ते मुंबईत घडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे येणाऱ्या मोकळ्या वेळेतलं राजकारण हे आरोग्यच्या विषयांभोवती फिरणार, हे नक्की.

  • कोरोनामुळे मुंबईतले व्यवहार, उद्दोगधंदे, मुंबईची लोकल ठप्प आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था बंद आहे यामुळे मुंबईत प्रदूषण कमी झाले आहे, ही बाब आनंदाची; परंतु हे किती काळ टिकणार? हा प्रश्न आहेच, कारण मुंबईत प्रदूषण किती होत असतं, हे मुंबईकरांना नवीन नाही. 

  • कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अस्तित्वात आली. ही संकल्पना अगोदर होतीच; पण याचा वापर होत नव्हता, तो होताना या काळात पाहायला मिळाला. या संकल्पना मुंबईकरांसाठी काही रित्या वरधान ठरतील. मुंबईच्या लोकलमधून 3-4 तास प्रवास करून ऑफिसमध्ये काम न करण्याऐवजी घरी बसून काम करणे सोयीस्कर होईल. लाखो लोकांचं ऑफिसमध्ये येणं-जाण थांबेल व वाहनांचा उपयोग कमी होऊन प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल.

  • कोरोनाच्या काळात मुंबईकर घरात बसून होते त्यामुळे त्यांना ज्या वस्तू पाहिजे होत्या; त्या लवकर मिळत नाहीत, त्यामुळे येथे काटकसर पाहायला मिळते, ही चांगली सवय पुढे नक्कीच कामाला येईल आणि याचा फायदा पर्यावरणाला आणि मुंबईकरांच्या खिशाला होईल.

  • कोरोनासोबत अजून एक गोष्ट मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे ती म्हणजे भीती. या भीतीचे परिणाम काय होतायत आपण पाहतोय. डॉक्टरांना मारहाण, नर्स आणि सफाई कामगारांशी खालच्या दर्जाची वागणूक. त्यांना घर खाली करण्यात सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे मानवी नात्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे, ही असुरक्षितता लवकर नष्ट होणार नाही. त्यामुळे आपल्या मनातील विश्वास आणि भीती मनात कायम घर करून राहील.

  • अनेक गरीब लोक पोट भरण्यासाठी मुंबईत येतात, परंतु कोरणामुळे त्यांच्या रोजीरोटीवर घात झालाय. तर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगभरातले गरीब हे गरीबच राहणार. भारतातील तब्बल चार कोटी लोक हे दारिद्र रेषेखाली ढकलले जातील. ही मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.

  • प्रत्येक चित्रपट, पुस्तक, कादंबरी, नाटक यामधून माणूस काहितरी शिकत असतो त्याचप्रकारे कोरोनाने देखील आपल्याला खूप काही शिकवलं, हे मुंबईचे चित्र आशादायक नाही; पण कोरोनाच्या साथीने एक गोष्ट सिद्ध केली, ती म्हणजे जरी मानव निर्मित यंत्रणा बंद पडल्या तरी माणूस माणसाला तारून नेऊ शकतो आणि हेच कलियुगात महत्वाचं आहे.