गेल्या काही दिवसांपासून देशासह मुंबईतही कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. सध्या राज्यातल्या रुग्णांचा आकडा 39 वर तर एकट्या मुंबईतला आकडा 6 वर गेला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यासह मुंबईतही कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हे सगळं असूनही मुंबईच्या शाहीनबाग म्हणून ओळख झालेल्या नागपडा परिसरातील मुंबई बागमध्ये महिलांचे आंदोलन सुरूच आहे.
केंद्र सरकारने देशात NRC आणि CAA कायदा लागू केला, मात्र तेव्हापासून देशात एक संतापाची लाट उसळली होती. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई बागमध्ये गेल्या 50 दिवसांपासून NRC आणि CAA विरुद्ध आंदोलन सुरु आहे. हे सगळं सुरू असताना मुंबईसारख्या कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहरात कोरोनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोना व्हायरसने महाराष्ट्रासह मुंबईत थैमान घातल असलं तरी आमचं आंदोलन थांबणार नाही. मात्र राज्य शासनाकडून घालून दिलेल्या नियम आणि अटीचं पालन करण्यात येईल, त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अशी प्रतिक्रिया आंदोलन कर्त्यांनी दिली.
आंदोलन जरी सुरु असल तरी आंदोलनाच्या ठिकाणी 50 हुन अधिक महिलांची परवानगी नाकरली आहे. जेष्ठ महिलांना इथे येण्यास मज्जाव केला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गेटवर सानीटायझर तसेच मास्कचे वाटप करण्यात येत आहे.



0 Comments