चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. दिवसाला हजारो लोकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. चीन सोबतच इटली, युरोप, इराण, जपान, अमेरिका, पाकिस्तान असे अनेक देश तसेच भारतातही कोरोना विषाणूचे पडसाद उमटत आहेत. 

इतर देशांच्या तुलनेत भारत देशात कोरोनाला बळी ठरण्याचा आकडा कमी आहे, कारण भारत सरकार लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती पाऊले उचलत आहे. यातच महाराष्ट्र राज्यात भारतातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यावर रुग्णांची वाढती संख्या बघता राज्य सरकार खबरदारी घेत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर मुंबई आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबईतील नागरिकांना बसणार आहे. 

गर्दी होईल असे मॉल्स, जिम्स, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे निर्णय घेतले. परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. हे सर्व मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे. यामुळे मुंबईच्या इतिहासात नक्कीच या गोष्टीची नोंद होईल. 

कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावू नये म्हणून सरकारने मुंबईत वाहतुकीचा सर्वात मोठा भाग असलेली रेल्वे सेवा ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हटले जाते, ही कोणासाठीही थांबत नाही, परंतु मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबईची लोकल थांबली. 

मुंबईची लाईफ लाईन मानली जाणारी लोकल बंद पडल्यामुळे कोणत्या व्यवसायाला त्याचा जास्त फटका बसेल? 

  • आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबईत जवळपास ७० लाख नागरिक दिवसाला रेल्वे ने प्रवास करत असतात. या प्रवाशांवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेवर लोकल बंद झाल्याचा परिणाम होणार.


  • शेअर बाजाराला मोठा फटका बसणार, कारण गुंतवणूकीचा मोठा प्रश्न इथेच उपस्थित राहातो.


  • चाकरमान्यांची कामाला जायची आणि आपल्या खिशाला परवडणारी सेवा म्हणजे लोकल. अनेक लोकांचे हातावर पोट असल्या कारणाने पोटापाण्याचा मोठा प्रश्न लोकल बंद झाल्याने उद्धभवणार आहे.


  • लोकल बंद झाल्याचा परिणाम मत्स्य व्यवसायावरही होणार आहे. कारण अनेक किरकोळ मच्छी विक्रेते आपल्या मालाची वाहतूक करण्यासाठी लोकलचा वापर करत असतात. मात्र लोकल बंद झाल्यामुळे याचा परिणाम मासेविक्रीवर होणार आहे.


  • मुंबई लोकल बंद झाल्यामुळे पर्यटनाशी निगडीत असलेल्या अनेक व्यवसायांवर याचा मोठा फटका बसणार आहे.


  • मुंबईतले सगळेच छोटे मोठे व्यवसाय आपल्या लोकलशी निगडीत आहेत, त्यामुळे मुंबई लोकल बंद होणे म्हणजे मुंबईची किडनी निकामी होणे होय.